औरंगाबाद – ‘नंगे से खुदा भी डरे’ याचा प्रत्यय लक्ष्मीपूजनच्या रात्री (ता. ७) औरंगाबाद पोलिसांना आला. उस्मानपूरा पोलिस स्टेशनमध्ये तृतीय पंथीची छेड काढल्यानंतर शहरातील अनेक तृतीय पंथिय तिथे गोळा झाले आणि त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये धुडगूस घालत फर्निचरची तोडफोड केली. पोलिसांची महत्त्वाची कागदपत्रे अस्ताव्यस्त केली. तृतीय पंथियांचे तांडव पाहून पोलिसही चक्रावून गेले. या तृतीय पंथियांना आवरणे कठीण असल्याचे पाहून पोलिसांनी अक्षरशः पोलिस स्टेशनमधून पळ काढला. पहाटे अतिरिक्त कुमक बोलावून त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले. तोपर्यंत उस्मानपूरा पोलिस स्टेशनमध्ये होळी आणि दिवाळी एकत्रच साजरी झाली होती. धुडगूस घालणाऱ्या तृतीयपंथियांविरोधात गुन्हा दाखल झाला असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहेे.
कोणी काढली होती छेड
उस्मानपूरा पोलिस स्टेशनमध्ये एका रिक्षा चालकाला पकडून आणण्यात आले होते. त्याच्या भेटीसाठी आलेल्या तृतियपंथीची पोलिस स्टेशनमध्ये सफाई कर्मचारी असलेल्या पूर्वाश्रमीच्या हिस्ट्रिशिटर खबऱ्याने छेड काढली. खबऱ्याने तृतीयपंथीची छेड काढत त्याला शिवीगाळ केली. पोलिस स्टेशनमध्ये छेडछाडीचा प्रकार घडल्याने चिडलेल्या तृतीय पंथीने त्या हिस्ट्रिशिटर खबऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. परंतू पोलिस दाद देत नसल्यामुळे तृतीय पंथीने आपल्या सहकाऱ्यांना पोलिस स्टेशनमध्ये बालावून घेतले. २०-२५ तृतीयपंथीचा जत्था तिथे दाखल झाला.
ऐन दिवाळीच्या रात्री पोलिस स्टेशनमध्ये होळी
तृतीयपंथींचा एवढा मोठा
ताफा पाहून हिस्ट्रिशिटर खबऱ्या पोलिस स्टेशनवरुन उडी मारुन पळून गेला. पोलिस
स्टेशनमधील सफाई कर्मचारी हा पोलिसच असल्याचा संशय येऊन तृतीय पंथियांनी त्याला
आमच्यासमोर हजर करा आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मध्यरात्री लावून
धरली. पोलिस छेड काढणाऱ्याला पकडून आणत
नाहीत आणि गुन्हाही दाखल करत नसल्यामुळे, संतप्त तृतीय पंथियांनी पोलिस स्टेशनमध्ये
धुडगूस घालण्यास सुरुवात केली. पोलिस स्टेशनमधील फर्निचरची तोडफोड केली.
मध्यरात्रीपासून सुरु झालेला हा धिंगाणा पहाटेपर्यंत सुरु होता. पहाटे अतिरिक्त
पोलिस कुमक आल्यानंतर मध्यरात्रीपासून सुरु असलेला तृतीयपंथियांचा धिंगाणा बंद
झाला. ऐन दिवाळीच्या रात्री उस्मानपूरा पोलिस स्टेशनमध्ये होळी साजरी झाल्याचे
प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले.
कारची काच फुटली
तृतीय पंथीची छेड काढणारा
खबऱ्या पोलिस स्टेशनवरुन उडी मारून पळून गेला. त्याने पोलिस स्टेशनच्या मागच्या
बाजूला असलेल्या गाड्यांवर उडी मारली, यामुळे एका कारची काच फुटली आहे. खबऱ्या
अद्याप फरार आहे.
तृतीय पंथियांवर गुन्हा दाखल
लक्ष्मीपूजनाच्या
मध्यरात्रीपासून उस्मानपूरा पोलिस स्टेशनध्ये हैदोस घालणाऱ्या ६ तृतीय पंथियांविरोधात
गुरवारी (ता. ८) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











